अलिबाग(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील आग्राव येथे आयोजित पारंपरिक शिडाच्या बोटींच्या स्पर्धेदरम्यान एक थरारक घटना घडली. साळाव-रेवदंडा पुलानजिक वळण घेत असताना स्पर्धेत सहभागी असलेली एक शिडाची बोट अचानक पलटी झाल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बोटीत असलेले सर्व स्पर्धक सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव यांनी सांगितले की, वळण घेताना बोटीचा समतोल बिघडल्याने ही दुर्घटना घडली. स्पर्धेतील वेग आणि वाऱ्याचा प्रभाव यामुळे बोट नियंत्रणाबाहेर गेल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. तथापि, अशा प्रकारच्या घटना स्थानिक कोळी समाजासाठी फारशा नवीन नसून त्या किरकोळ स्वरूपाच्या मानल्या जातात, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या घटनेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला असता सुरुवातीला आयोजकांकडे विचारणा करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देण्यास सांगण्यात आले. दुपारी सुमारे तीन वाजता पोलिस ठाण्यात भेट दिल्यानंतर जवळपास दीड तास प्रतीक्षा करावी लागली. अखेरीस पोलिस कर्मचाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे एपीआय जाधव यांच्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली.
या घटनेनंतरही स्पर्धेचा उत्साह कायम राहिला असून आयोजकांनी सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
Home ताज्या बातम्या शिडाच्या बोटीच्या स्पर्धेत बोट पलटी; सर्व स्पर्धक सुरक्षित, ‘कोळ्यांसाठी किरकोळ बाब’ –...





