अलिबाग(प्रतिनिधी):रायगड पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत नेरळ परिसरात एक टँकर जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक किमतीची दारू जप्त करण्यात आली असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी रात्री गुप्त माहितीच्या आधारे नेरळ पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. राजस्थान येथील ४२ वर्षीय आरोपी आपल्या ताब्यातील टँकरमधून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या वाहतूक करत होता. पोलिसांनी त्याला करजत-मुरबाड मार्गावर अडवून ताब्यात घेतले.
या कारवाईत टँकरसह विविध ब्रँडची व्हिस्की व व्होडकाच्या हजारो बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण जप्त मालाची किंमत सुमारे १,०१,२७,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





