अलिबाग (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा संघटनेत संघटनात्मक बदल करत अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील ॲड. मनोज ओव्हाळ यांची मंडळ सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र पक्षाचे मंडळ अध्यक्ष रोशन चंद्रकांत भगत यांनी २२ मार्च २०२६ रोजी केले.
नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, राज्यात पक्षाची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बळकट होत असून, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पातळीवर संघटन अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ॲड.मनोज ओव्हाळ यांच्यावर मंडळातील संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पक्षाच्या धोरणांचा प्रसार, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे तसेच विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर सक्रिय कार्यकर्ते म्हणून ॲड.ओव्हाळ यांची ओळख असून, त्यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीनंतर परिसरातील भाजप कार्यकर्त्यांकडून ॲड. मनोज परशुराम ओव्हाळ यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात ते संघटनात्मक काम अधिक जोमाने पुढे नेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





