रायगड जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर विविध विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी सोमवारी (२३ मार्च) झालेल्या विशेष सभेत चारही सभापती बिनविरोध निवडून आले. या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली आहेत.
१२ मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी जिल्हा नियोजन सभागृहात पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेत शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
रसिका केणी यांच्याकडे महिला व बालविकास समितीचे सभापतीपद सोपविण्यात आले असून, नारायण डामसे यांच्याकडे समाजकल्याण समितीची धुरा देण्यात आली आहे. उर्वरित दोन सभापतींच्या खात्यांचे वाटप अद्याप प्रलंबित आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सकाळच्या सत्रात चारही समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाला होता. दुपारी दोन वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात होताच प्रत्येक पदासाठी एकमेव उमेदवारी असल्याने सुनिल थोरवे यांनी चौघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली.
या प्रक्रियेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके तसेच तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी सहाय्य केले. निवडीनंतर अध्यक्ष मंगेश वाकडीकर व उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह सदस्य, पंचायत समिती सभापती आणि समर्थकांनी नव्या सभापतींचे अभिनंदन केले. दरम्यान, निवड प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.