उद्धव ठाकरेंचा भावनिक निरोप; भाषणातून शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नीलम गोऱ्हेंची जोरदार प्रतिक्रिया


मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ आज संपुष्टात आला. यानिमित्ताने विधान परिषदेत केलेल्या आपल्या अखेरच्या भाषणात त्यांनी भावनिक सूर लावत ज्येष्ठ कवींच्या ओळींमधून मनातील खंत व्यक्त केली.
भाषणादरम्यान त्यांनी आपण ज्या व्यक्तींना मोठे केले, त्यांना सर्व काही दिले, तीच माणसे आपल्याला सोडून गेल्याची खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी कवी सुरेश भट यांच्या “मित्र कोण-शत्रू कोण मला कळेलच नाही” या ओळी उद्धृत करत आपली व्यथा मांडली. तसेच कवी विंदा करंदीकर यांच्या “केले कुणास्तव ते किती, ते मोजू नये; होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे” या कवितेचा आधार घेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या भाषणातून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे अनेक वेळा निशाणा साधल्याचे दिसून आले. त्यांच्या वक्तव्यातून राजकीय परिस्थितीबाबतची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती.
दरम्यान, ठाकरे यांच्या या भाषणावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.“मी लोकांच्या निशाण्यावर आले तरी चालेल, पण आज ठाकरेंना उत्तर देणारच,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.
या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे.