अलिबाग (प्रतिनिधी): मानवी संवेदनांना हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आली असून तब्बल दहा वर्षे मजुरी करूनही हक्काचा मोबदला न मिळालेल्या दाम्पत्याची अखेर सुटका झाली आहे. संतोष आणि सुनीता वाघमारे या दाम्पत्याला मालक अनिल चव्हाण याने वर्षानुवर्षे काम करून घेतले, मात्र त्यांच्या मजुरीचा कोणताही हिशोब दिला नव्हता.
या प्रकरणात अधिक वेदनादायी बाब म्हणजे, वाघमारे दाम्पत्याच्या अनिता आणि पूजा या दोन मुलींना गेल्या तीन वर्षांपासून जबरदस्तीने आपल्या ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यामुळे स्वतःची सुटका करून घेताना आई-वडिलांना आपल्या लेकरांना तिथेच सोडून जाण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली होती.
दरम्यान, ही बाब सर्वहारा जन आंदोलन संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर संघटनेने तातडीने हस्तक्षेप केला. प्रकरण कर्नाटक राज्याशी संबंधित असल्याने सुरुवातीला अनिल चव्हाण याने मुली आपल्या ताब्यात नसल्याचे सांगत टोलवाटोलवी केली. मात्र, संघटनेने कायदेशीर कारवाईचा इशारा देत पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवल्यानंतर चव्हाण याने अखेर सत्य कबूल केले.
संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रविवारी (२२ मार्च २०२६) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे अनिता आणि पूजा या दोन्ही मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. तब्बल तीन वर्षांनंतर आपल्या मुली सुरक्षित परत मिळाल्याने वाघमारे कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला.
या घटनेमुळे बेकायदेशीर मजुरी, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि बालकांना ओलीस ठेवण्याच्या गंभीर प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरत आहे.





