मतिमंद मुलांसाठी अलिबागमध्ये विशेष दंत तपासणी शिबिर आयोजित


अलिबाग(प्रतिनिधी): शिवसेना महिला संघटित अलिबाग, उद्यम सखी संस्था आणि जिल्हा सामान्य रुग्णालय रायगडच्या दंत विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. २५ मार्च २०२६) मतिमंद मुलांसाठी विशेष दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून मुलांच्या तोंडी आरोग्याची तपासणी करून आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात तज्ञ डॉ.ऋतुजा माळी डॉक्टरांनी मुलांची सखोल तपासणी केली तसेच पालकांना दातांची स्वच्छता, योग्य आहार आणि नियमित तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य जुईली जुईकर दळवी, उद्यम सखीच्या सीईओ प्रार्थना प्रशांत नागवेकर, युवतीसेना अलिबाग तालुका अध्यक्ष कु. जान्हवी मंगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच युवतीसेना उपविभाग प्रमुख सौं. मीनल ऋग्वेद ठाकूर, महिला विभाग प्रमुख सौं. प्रणिता प्रल्हाद म्हात्रे, महिला विभाग संपर्क प्रमुख सौं. अनिता निगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सौं. अहिल्या पाटील आणि दक्षिण रायगड महिला संपर्क प्रमुख सौं. संजीवनी नाईक यांनीही सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे मतिमंद मुलांच्या आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करण्यात आली.