अलिबाग-पेण मार्गावर भीषण अपघात; सहा जण गंभीर जखमी


अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग-पेण मार्गावर गुरुवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात होऊन सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तिनविरा ते मैनुशेठ वाडा दरम्यान सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समोरासमोर झालेल्या धडकेत इरटीका आणि इको या वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या सहाय्याने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वेग आणि निष्काळजीपणा यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, नागरिकांनी या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.