क्षयरोग दिनानिमित्त रॅली, पथनाट्यातून जनजागृती


अलिबाग (प्रतिनिधी): जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारी (ता.24) अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅली काढून, पथनाट्य सादर करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्राची नेहुलकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सामुदायिक औषधशास्त्राचे विभागप्रमुख डाॅ. हरळकर यांच्यासह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सर्वांना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींसाठी शपथ देण्यात आली. सकाळी 8 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मारुती नाका, बालाजी नाका, महाविर चैक, एसटी स्टॅंड, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चैक, तेथून छत्रपती शिवाजी महाराज चैक, बाजारपेठमार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात आल्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जनजागृतीपर पथनाट्य सादर करून क्षयरोगमुक्तीसाठी नागरिकांनी सतर्क राहावे, लक्षणे आढळल्यास त्वरीत आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
जिल्ह्यात विविध ठिकाणी क्षयरुग्णांना पोषण आहार किट (फूड बास्केट) देखील वितरित करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवात राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणा-या ‘निक्षय मित्र’ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे अलिबाग तालुक्यातील सहाण, पेढांबे, चिंचोटी व बेलोशी या ग्रामपंयातींना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायती म्हणून सन्मानित करण्यात आले.