रायगड जिल्ह्यातील 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त क्षयरोगमुक्तीसाठी जिल्ह्यात 100 दिवसांचे विशेष अभियान


अलिबाग (प्रतिनिधी): क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठोस पाऊल उचलले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. जिल्ह्याला पूर्णपणे क्षयरोगमुक्त करण्यासाठी 100 दिवसांचे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सन 2023पासून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात 2023 साली 90, 2024 साली 376 तर सन 2025 साली तब्बल 444 ग्रामपंचायतील या क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. सध्या 2 हजार 549 क्षयरुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे 2 हजार 101 रुग्णांनी क्षयरोगावर मात करून ते पूर्णपणे बरे झाले आहेत.
जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षात एकूण 4 हजार 308 रुग्णांची नोंद झाली. यापैकी 2 हजार 102 रुग्णांवर उपचार झाल्यानंतर ते पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 हजार 788 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते मार्च 2026 या तीन महिन्यात 879 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 761 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे सन 2025 साली जिल्ह्यातील तब्बल 444 ग्रामपंचायतील या क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. जिल्ह्याला पूर्णपणे क्षयरोगमुक्त करण्यासाठी 100 दिवसांचे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कंपन्या निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना पोषक आहारही उपलब्ध करून देत आहेत.
नुकतेच जिल्हा विकास यंत्रणा, रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आयोजित मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवात अलिबाग तालुक्यातील क्षयरोगमुक्त झालेल्या सहाण, चिंचोटी, बेलोशी व पेढांबे या ग्रामपंचायतींनी सुवर्ण प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

**********
तालुकानिहाय क्षयरोगमुक्त ग्रामपंचायती:
अलिबाग 54, कर्जत 27, महाड 65, माणगाव 33, पेण 21, पनवेल 41, रोहा 37, श्रीवर्धन 24, उरण 27, खालापूर 18, पोलादपूर 28, सुधागड 24, मुरूड 12, तळा 6, म्हसळा 27

********
100 दिवसांचे विशेष अभियानाची वैशिष्ट्ये:
– घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी
– आधुनिक यंत्रणेद्वारे वेळेत चाचणी
– रुग्णाने औषधोपचार अर्धवट सोडू नये यासाठी पाठपुरावा
– शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी प्रबोधन
– आवश्यक दुर्गम भागात तपासणी शिबिरांचे आयोजन

क्षयरोगाची प्राथमिक लक्षणे:
– 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला.
– खोकल्यातून कफ पडणे किंवा कफामध्ये रक्त येणे.
– श्वास घेताना किंवा खोकताना छातीत वेदना होणे.
– भूक न लागणे, वजन अचानक कमी होणे.
– रात्री झोपेत खूप घाम येणे.
– सतत थकवा जाणवणे.

**********
क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असल्या तरी संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करायचा आहे. नागरिकांनीही क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्या व त्वरीत उपचार सुरू करा.
– डाॅ. प्राची नेहुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, राजिप