अलिबाग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) यांच्या निगमित सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत थळ युनिट परिसरातील गावांतील अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरसीएफ कॉलनी येथे झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. निवड करण्यात आलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सातत्य ठेवण्यास आणि उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाला RCF चे कार्यकारी संचालक श्री. नितीन हिरडे, वरिष्ठ अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. हिरडे म्हणाले की, “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी RCF कटिबद्ध आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी नवी दिशा मिळेल.”
विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी RCF च्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. या शिष्यवृत्तीमुळे शिक्षणाचा आर्थिक भार कमी होऊन विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
RCF तर्फे शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि समाजकल्याण या क्षेत्रांत विविध CSR उपक्रम राबवले जात असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे.





