पुणे (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीमध्ये महत्त्वाची घडामोड घडली असून प्रदेशाध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या लेटरहेडवर दिलेल्या पत्रात चाकणकर यांनी नमूद केले आहे की, “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारावा.” अत्यंत थोडक्यात आणि औपचारिक शब्दांत त्यांनी आपला निर्णय व्यक्त केला आहे.
या राजीनाम्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पक्षांतर्गत घडामोडी आणि आगामी राजकीय रणनीतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राज्यातील सत्तासमीकरणे आणि पक्षातील बदलत्या समीकरणांचा यावर परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतील सक्रिय आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला संघटना बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, पक्षाकडून या राजीनाम्याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पुढील काही दिवसांत पक्षाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





