रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात यंदा खर्चात तब्बल दुप्पट वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सुरुवातीला 85.85 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक मांडण्यात आले होते; मात्र वर्षभरातील वाढीव तरतुदी व सुधारित खर्चामुळे अंतिम अंदाजपत्रक थेट 175.77 कोटी रुपयांवर पोहोचले. या पार्श्वभूमीवर सन 2026-27 साठी 175.05 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सादर केला.
वाढीव खर्चाची हीच पातळी पुढील वर्षासाठी कायम ठेवण्यात आल्याचे चित्र असून, जिल्हा परिषदेच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाकडून मात्र या वाढीचा बचाव करत विकासकामांना गती देण्यासाठी निधी वाढविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेषतः इमारती व दळणवळण, समाजकल्याण, पाणीपुरवठा आणि शिक्षण या प्रमुख विभागांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि, मूळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत खर्च दुप्पट होण्यामागील कारणे, निधीचे नियोजन आणि त्याचा कार्यक्षम वापर याबाबत अधिक पारदर्शकता व उत्तरदायित्वाची मागणी होत आहे.
सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी पुढीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे :
शिक्षण विभाग : 22.34 कोटी
इमारती व दळणवळण (बांधकाम) : 36.02 कोटी (सर्वाधिक)
पाणीपुरवठा : 26.70 कोटी
समाजकल्याण : 34.35 कोटी
महिला व बालकल्याण व सामुदायिक विकास : 15.68 कोटी
दिव्यांग सक्षमीकरण : 7.54 कोटी
पाटबंधारे : 7.36 कोटी
सार्वजनिक आरोग्य : 5.19 कोटी
पशुसंवर्धन : 4.20 कोटी
कृषी : 4.05 कोटी
प्रशासन : 2.05 कोटी
सामान्य प्रशासन : 2.17 कोटी
संकीर्ण योजना : 19.43 कोटी
इतर खर्च : 0.11 कोटी
एकूणच, वाढीव निधीमुळे विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असली तरी, खर्चाचे योग्य नियोजन आणि पारदर्शक अंमलबजावणी हीच खरी कसोटी ठरणार आहे.
Home ताज्या बातम्या रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात खर्च दुपटीने वाढ; 2026-27 साठी 175 कोटींची तरतूद





