अलिबाग (प्रतिनिधी) : सिन्नर (नाशिक) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पनवेलचे आमदार तथा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केले.
सिकेटी कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या पुरुष व महिला कबड्डी संघांच्या सराव शिबिराला भेट देताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते महिला संघाच्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, रायगडचे दोन्ही संघ तुल्यबळ असून खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. सर्वांनी एकजुटीने खेळ करत उत्तम यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या प्रसंगी शिबिर प्रमुख तथा आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले.
दरम्यान, सराव शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देत स्पर्धेत यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल पुरुष व महिला संघांच्या वतीने त्यांचा क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला.

यावेळी शिबिर प्रमुख शरद कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, सुनिल पाटील, नाईक सर, विश्वनाथ पाटील, संकेत म्हात्रे, मंदार मुंबईकर, विपुल मोकल तसेच असोसिएशनचे पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





