उष्णतेचा कडाका वाढला; उष्माघात टाळण्यासाठी प्रशासन सज्ज


अलिबाग (प्रतिनिधी): जिल्ह्यात सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार कक्ष उभारण्यात आले आहेत. तसेच आवश्यक औषधे, थंड पाण्याची सुविधा, सलाईन, वैद्यकीय कर्मचारी यांचीही उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करताना सांगितले की, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
तसेच शरीराला थंडावा मिळावा यासाठी सुती व फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. भरपूर पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित सेवन करणे आवश्यक आहे. अनवाणी बाहेर जाणे टाळावे, कारण गरम जमिनीमुळे पायांना इजा होऊ शकते.
उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, अंगात अशक्तपणा जाणवणे आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी अफवा किंवा दुर्लक्ष न करता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.