अलिबाग (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे गटनेते अमित नाईक यांनी अर्थसंकल्पावर बोलताना विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यांनी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प विक्रमी असल्याचे सांगत काही मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधले.
अमित नाईक म्हणाले की, जिल्ह्यात प्राणी व पशुधनासाठी वैद्यकीय दवाखाने उपलब्ध असले तरी त्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आधुनिक उपकरणे व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, लहान बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंगणवाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे अंगणवाड्यांमधील कामकाज अधिक पारदर्शक होईल आणि पालकांनाही विश्वास वाटेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, भजनी मंडळांना साहित्य वाटप करताना पारदर्शक व न्याय्य निकष लागू करण्यात यावेत, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.
अमित नाईक यांच्या या मागण्यांमुळे विकासकामांबरोबरच सुरक्षितता आणि पारदर्शकतेवरही भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.





