रायगड (प्रतिनिधी) : समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरत असताना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्वलनशील पदार्थांची अनियंत्रित विक्री टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत पेट्रोल व डिझेलची खुल्या कंटेनरमध्ये विक्री पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालकांनी इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत कॅन, बाटली, डबा किंवा इतर अनधिकृत भांड्यात पेट्रोल-डिझेल देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, सर्व पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीची नोंद व्यवस्थित राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनधिकृतपणे पेट्रोल-डिझेलचा साठा करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कडक कारवाई केली जाणार आहे.
हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम २००२ मधील नियम ११८ ते २०२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.






