महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पल्लवी तुळपुळे यांची नियुक्ती


रायगड (प्रतिनिधी) : चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पल्लवी तुळपुळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले.
या नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, पल्लवी तुळपुळे या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, पक्षाच्या कार्यात त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग आणि योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
ॲड. पल्लवी तुळपुळे या गेली २० वर्षे अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत असून सातत्याने मेहनतीने आपले काम करत आहेत. तसेच नेतृत्वगुण अंगी असलेल्या पल्लवी तुळपुळे या सन २०१८ पासून भारतीय जनता पार्टीसाठी कार्यरत असून पुढेही त्या पक्षासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पत्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली प्रतिष्ठा अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची प्रगती होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
महिला मोर्चाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत पक्षाची धोरणे आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, तसेच महिलांना संघटित करून पक्ष बळकट करण्याची जबाबदारी पल्लवी तुळपुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर महिला मोर्चाला अधिक बळकटी मिळणार असून, आगामी काळात पक्ष संघटन विस्तारासाठी त्यांच्या कार्याचा निश्चितच उपयोग होणार आहे.