रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतींना खातेवाटप


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता.७) जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभापतींना खातेवाटप करण्यात आले.
अध्यक्ष मंगेश वाकडीकर हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असून उपाध्यक्ष मधुकर पाटील यांना बांधकाम व‌ आरोग्य, चंद्रकांत कळंबे यांना अर्थ, शिक्षण, क्रीडा, वैकुंठ पाटील यांना कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती सभापतीपद देण्यात आले.
सभेच्या सुरुवातीला उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार, एका दिवसाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाईसाहेब पाशिलकर व वसंत माले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुखवट्याचा ठराव मांडला. त्याला सर्व सभागृहाने अनुमोदन दिले. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या ठेवी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवण्यात आल्या असून, या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवाव्यात असा ठराव मांडला. या ठरावावर सभागृहात चर्चा करण्यात आली. चर्चेअंती जिल्हा परिषदेच्या ठेवी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अलिबाग शाखेत ठेवण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी जाहीर केले. यासोबतच शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
सभेसाठी समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका केणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जालिंदर पठारे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पत्रकार उपस्थित होते.