ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या मेंटेनन्सची पंडितशेठ पाटील यांची मागणी


अलिबाग (प्रतिनिधी): माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाला भेट देत अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत महत्त्वाची मागणी केली.
या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत ग्रामीण भागातील अनेक रस्ते सध्या जीर्ण अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट होत असल्याने तातडीने मेंटेनन्सची कामे हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाटील यांनी अलिबाग, रोहा आणि मुरुडमधील ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांचे नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी, तसेच खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. यासोबतच कामांमध्ये दर्जा राखून वेळेत पूर्णता करावी, यावरही त्यांनी भर दिला.
नागरिकांच्या दळणवळणाची सोय सुरळीत राहावी आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.