गेटवे- मांडवा जलवाहतूक पूर्वपदावर, अजंठासह सर्व लॉन्च सेवा पुन्हा सुरू


अलिबाग रायगड : गेटवे – मांडवा/अलिबाग या जलमार्गावरील जलवाहतूक सेवा बुधवार दि. ७मे रोजी दुपारी वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही सेवा देणाऱ्या संस्थेच्या वतीने बंद करण्यात आली होती, तर काही सेवा काही अंतराने सुरू होती, मात्र शनिवार दि. १० मे पासून वातावरण सुरळीत झाल्यामुळे सर्व सेवा सकाळपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली असल्याचे जलसेवा देणाऱ्या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे, तरी पर्यटक व इतर प्रवाशांनी या लॉन्च सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
           याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेटवे-मांडवा/अलिबाग या जलमार्गाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील हजारो पर्यटक व प्रवाशी या जलप्रवासाला प्रथम पसंती देतात, वेळेचा व इंधनाचा बचत करणारा आरामदायी सुखकर प्रवास असल्याने या मार्गाने दररोज हजारो पर्यटक प्रवासी प्रवास करत असतात. बुधवार दि. ७मे रोजी दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वादळी वारे वाहत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसू लागला होता, त्यामुळे या मार्गावरील जलवाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने काही सेवा बंद करण्यात आली होती, तर काही सेवा काही अंतराने चालू होती. जलवाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पर्यटकांची व प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्यामुळे मनस्ताप सहन करत पर्यायी रस्ते मार्गाने प्रवास करावा लागला, यामध्ये सर्वांचेच प्रचंड हाल झाले. मात्र, शुक्रवारपासून वातावरण सुरळीत झाल्यामुळे दि.१० मे पासून सर्व लॉन्च सेवा नेहमी प्रमाणे सुरळीत चालू करण्यात आल्या असल्याचे जलसेवा देण्याऱ्या अजंठा जलसंस्थेच्यावतीने सांगण्यात आले असून पर्यटकांनी व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लॉन्च सेवेचा पर्यटकांनी व प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन