सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांची माहिती
पेण रायगड : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील मालवाडी आदिवासी वाडी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही रस्ता आणि पाण्यापासून वंचित आहे. लाखो रुपयांचे ठेके घेऊनही कामे रखडल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या विरोधात आदिवासी समाज मंगळवारी भोगावती नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहे.
वाडीच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पेण यांचेकडून सहा महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देऊन काम करण्याची मुदत संपली तरी रस्त्याचे काम सुरू झाले नाही सदर वाडीला रस्ता नसल्यामुळे नुकतीच एक गर्भवती महिला वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यामुळे तिचे बाळ दगावले होते, असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. अशा कामचुकार ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अभियंत्यांवर कारवाई करून मालवाडीला पिण्याचे शुद्ध पाणी आणि रस्ता मिळावा या मागणीसाठी उद्या मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता पेण येथील भोगावती नदी पात्रात मालवाडीतील आदिवासी बांधव जल समाधी घेणार आहोत, अशी माहिती ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली.









