अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील फोफेरी येथील युवा जलतरणपटू सारा अभिजीत वर्तक हिची बँकॉक येथे होणाऱ्या AOSI Swimming Championship 2026 या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र ॲक्वाटिक इंडिया संघात निवड झाली आहे. साराच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
साराने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः ओपन-वॉटर स्विमिंग प्रकारात तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, भारताची आश्वासक युवा जलतरणपटू म्हणून ती पुढे येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची झालेली निवड ही फोफेरीसह अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
साराच्या यशाचे कौतुक करताना चित्रलेखा पाटील यांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील खेळाडूंनी सातत्याने मेहनत घेतल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन करता येते, याचे साराचे यश प्रेरणादायी उदाहरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी साराचे वडील अभिजीत वर्तक, शे.का.प. नेते अनिल पाटील, दिलीप गावंड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
बँकॉक येथे होणाऱ्या आगामी स्पर्धेत सारा उत्तम कामगिरी करून देशाचे आणि रायगडचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करत उपस्थितांनी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.









