नवी मुंबई (प्रतिनिधी): अवघ्या ५० रुपयांच्या भाड्यावरून झालेला वाद एका १९ वर्षीय रिक्षाचालकाच्या जीवावर बेतला. सुजनकुमार महतो राहणार घणसोली याला धारदार प्रहार करून संपवण्यात आले होते. या प्रकरणाचा छडा लावत नवी मुंबई गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांनी साहील आनंदा सुर्वे वय २०वर्ष आणि साहील यशवंत खराल वय २० वर्ष, दोघेही राहणार मानखुर्द यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुजनकुमार २८ ऑगस्टच्या सायंकाळी रिक्षा घेऊन प्रवासी वाहतुकीसाठी घराबाहेर पडला होता. २९ ऑगस्ट रोजी पहाटे साडे ३ वाजता कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातून दोन तरुण त्याच्या रिक्षात बसले. त्यांनी मानखुर्दला जाण्यास सांगितले. सुजनने भाडे १५० रुपये सांगितले; मात्र आरोपींकडे केवळ १०० रुपये असल्याने वाद झाला. रिक्षा सेक्टर-५ येथील हनुमान मंदिराजवळ आल्यानंतर आरोपींनी सुजनकुमारला धमकावले.
पुढे वाशीतील फोर्टिस हॉस्पिटलजवळील मिनी सी-शोअर गार्डन परिसरात दुसरा ग्राहक मिळाल्याने सुजनने आरोपींना रिक्षातून उतरण्यास सांगितले. यावेळी पुन्हा वाद झाला आणि आरोपींनी सुजनवर घातक वार केले. गंभीर जखमी सुजनचा तेथेच अंत झाला. त्यानंतर आरोपी रिक्षा घेऊन पसार झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. दोघांना मानखुर्द परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. साहील सुर्वे याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, तो ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जामिनावर बाहेर आला होता, असे समजते. याबाबत पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.









