‘उठता-बसता तटकरेच दिसतात’; महेंद्र दळवींवर अनिकेत तटकरे यांचा जोरदार पलटवार


‘आम्ही संपलो असू तर आमचे नाव वारंवार घेण्याचे कारण काय?’; विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याचा दिला सल्ला

रायगड (विशेष प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेला आता अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दळवी यांना उठता-बसता, सकाळी-दुपारी आणि अगदी झोपेतही तटकरेच दिसतात, असा खोचक टोला अनिकेत तटकरे यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे रायगडमधील महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अनिकेत तटकरे म्हणाले, “उठता-बसता तटकरे, सकाळी, दुपारी आणि झोपेतही तटकरे दिसतात. आम्ही जर संपलो असू, तर आमचे नाव वारंवार घेण्याचे कारण काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तटकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा विकासाच्या प्रश्नांवर बोलावे, असा सल्लाही त्यांनी दळवींना दिला.
महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या ‘सरोगसी’ या वक्तव्याचाही अनिकेत तटकरे यांनी समाचार घेतला. ‘सरोगसी’ या शब्दाचा नेमका अर्थ मराठीत किंवा इंग्रजीत स्पष्ट करून दाखवावा, अशी मागणी त्यांनी केली. निवडणुका जवळ आल्या की तटकरे यांचे नाव घेतले जाते आणि निवडणूक संपल्यानंतर त्यांना विसरले जाते, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी अनिकेत तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासह महायुतीतील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. महायुतीतील नेत्यांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
सुनील तटकरे आणि महेंद्र दळवी यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप गेल्या काही काळापासून तीव्र झाले आहेत. त्यात आता अनिकेत तटकरे यांनी थेट हस्तक्षेप करत दळवींच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिल्याने रायगडच्या राजकारणातील वातावरण आणखी तापले आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा सुरू झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.