मयत आणि आरोपी एकाच गावातील; परस्पर नातेवाईक असल्याची पोलिसांची माहिती
अलिबाग (प्रतिनिधी) : मापगाव येथील टाकादेवी परिसरातील खाणीत विजय ऊर्फ बाबू दशरथ थळे यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.
या हत्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास अलिबाग पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मयत विजय ऊर्फ बाबू दशरथ थळे आणि दोन्ही आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून ते परस्परांचे नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. हत्येच्या घटनेशी संबंधित विविध बाबींची चौकशी तसेच उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मापगाव-थळे हत्याप्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करीत असून, हत्येमागील कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील तपासातून समोर येणार आहे.









