अलिबाग नगरपरिषदेत लोककल्याण मेळावा; ५५६ पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधीचा लाभ
अलिबाग(प्रतिनिधी): शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात पथविक्रेत्यांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळावे आणि त्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी अलिबाग नगरपरिषदेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य, शासकीय योजनांची माहिती तसेच आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी नगरपरिषद सहकार्य करेल, अशी ग्वाही नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी दिली.
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेचा लाभ अधिकाधिक पथविक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या पुढाकारातून अलिबाग नगरपरिषद सभागृहात लोककल्याण मेळावा व स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला पथविक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मार्च २०२० ते जून २०२६ या कालावधीत अलिबाग नगरपरिषद हद्दीतील ५५६ पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात व्यवसायावर झालेल्या परिणामामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या पथविक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी या योजनेतून मोठा आधार मिळाला. केंद्र शासनाने पीएम स्वनिधी योजनेची मुदत आता मार्च २०३० पर्यंत वाढवली आहे.
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना ७ टक्के व्याज अनुदान मिळते. तसेच मुदतपूर्व कर्जफेड केल्यास कोणताही दंड आकारला जात नाही. या सुविधांबरोबरच केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही मेळाव्यात पथविक्रेत्यांना देण्यात आली.
योजना आणि लाभार्थ्यांमध्ये दुवा
शासकीय योजना केवळ कागदोपत्री न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी या मेळाव्यात विशेष भर देण्यात आला. विविध बँकांच्या व्यवस्थापकांनी कर्ज व इतर योजनांची माहिती दिली, तर नगरपरिषद प्रशासनाकडून अर्ज प्रक्रिया, कर्जप्रक्रिया आणि उपलब्ध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
त्यामुळे हा उपक्रम केवळ कर्ज मिळवून देण्यापुरता मर्यादित न राहता पथविक्रेत्यांना विविध शासकीय सुविधांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा ठरला. पथविक्रेत्यांच्या आर्थिक अडचणी, व्यवसायवाढीच्या संधी आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबतही यावेळी संवाद साधण्यात आला.
मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सुमारे १२० लाभार्थी उपस्थित होते. योजना, प्रशासन आणि लाभार्थी यांच्यात थेट संवाद निर्माण करून पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
कार्यक्रमाला महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी ठोसर, नगरसेविका संध्या पालवणकर, निवेदिता वाघमारे, नगरसेवक संदीप पालकर, अंकित बंगेरा, समीर ठाकूर, निलम हजारे, तसेच अन्य नगरसेवक-नगरसेविका, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे, DAY-NULM समुदाय संघटक स्नेहा रणदिवे आणि नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
“पथविक्रेते शहराच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांना आर्थिक आधार आणि शासकीय योजनांची योग्य माहिती मिळाल्यास त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळू शकते. त्यासाठी नगरपरिषदेकडून आवश्यक सहकार्य केले जाईल.”
— अक्षया नाईक, नगराध्यक्षा
“पथविक्रेत्यांना केवळ कर्जाचा लाभ मिळवून देणे हा उद्देश नाही; त्यांना शासकीय योजनांशी जोडून व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही आमची प्राथमिकता आहे.”
— ॲड. मानसी म्हात्रे, सभापती









