हातखंबा-निवळी-बावनदी उतारावरील घटना; मोफत रुग्णवाहिकेने जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले
रत्नागिरी (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरातील निवळी-बावनदी उतार येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय गोविंद रांबाडे (वय ५२, रा. संगमेश्वर, वांगणी) हे दुचाकी क्रमांक MH 08 AH 5010 वरून रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात होते. निवळी-बावनदी उतारावर त्यांची दुचाकी अचानक घसरल्याने ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांना दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थेची हातखंबा येथे २४ तास कार्यरत असलेली मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका पथकाने जखमी धनंजय रांबाडे यांना प्राथमिक मदत करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
अपघातानंतर काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्याने जखमीला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. महामार्गावरील अपघातांच्या प्रसंगी तातडीने उपलब्ध होणारी ही मोफत रुग्णवाहिका सेवा जखमींना उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.









