सिडकोच्या धर्तीवर सक्षम यंत्रणा उभारण्याची माजी आमदार पंडित पाटील यांची मागणी
वाढते शहरीकरण, पाणीपुरवठा, रस्ते आणि कचरा व्यवस्थापनाचा एकत्रित विचार करण्याचे आवाहन
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्याचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता सिडकोच्या धर्तीवर स्वतंत्र आणि सक्षम प्राधिकरणाची निर्मिती करून त्यामार्फत नियोजनबद्ध विकास करावा, अशी मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे. वाढते बांधकाम, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक तसेच घनकचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांचा एकत्रित विचार करून भविष्यातील विकासाचे नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अलिबाग तालुक्यात गेल्या काही वर्षांत नागरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत निवासी तसेच व्यावसायिक बांधकामे वाढत असून, उपलब्ध पायाभूत सुविधांवर त्याचा ताण निर्माण होत आहे. या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक क्षमता आणि प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा, रस्त्यांची क्षमता, वाहतूक कोंडी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांचा स्वतंत्रपणे विचार करण्याऐवजी त्यांचे एकत्रित नियोजन आवश्यक आहे. भविष्यातील लोकसंख्या आणि बांधकामवाढ लक्षात घेऊन आजच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत, तर आगामी काळात या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.
ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती, वाढत्या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि झपाट्याने होत असलेले शहरीकरण या तीन प्रमुख प्रश्नांकडे शासन आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी अलिबाग तालुक्याच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पंडित पाटील यांनी केली.
“सिडकोच्या धर्तीवर सक्षम प्राधिकरणाची निर्मिती करून अलिबागचा नियोजनबद्ध विकास केला पाहिजे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाणी, रस्ते, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापनाचे एकत्रित नियोजन करणे आवश्यक आहे.”
— पंडित पाटील, माजी आमदार
“ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती, कचरा व्यवस्थापन आणि झपाट्याने वाढणारे शहरीकरण या प्रश्नांकडे शासन व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा.”
— पंडित पाटील, माजी आमदार









