महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी शासनाचा पुढाकार
शेती, पशुपालन व दुग्धव्यवसायातील महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
रायगड (प्रतिनिधी) :शेती, पशुपालन आणि दुग्धव्यवसायात महिलांचे मोठे योगदान असूनही त्यांना अनेकदा ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या माध्यमातून महिलांना ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी, दुग्धविकास व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी केले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शेतीची मशागत, पेरणी, लागवड, कापणी, पशुपालन तसेच दुग्धव्यवसायातील विविध कामांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने योगदान देत आहेत. अनेक कुटुंबांच्या शेती आणि पशुपालन व्यवसायाची जबाबदारी महिला सांभाळत आहेत. मात्र, त्यांच्या या योगदानाला अधिकृत स्वरूपात शेतकरी म्हणून मान्यता मिळत नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होतात.
महिलांना ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ मिळाल्यानंतर त्यांच्या शेती व कृषीपूरक व्यवसायातील सहभागाला अधिकृत ओळख मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध कृषीविषयक योजना, प्रशिक्षण, अनुदान तसेच इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतीसोबतच पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. महिला शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.
“महिला शेती, पशुपालन आणि दुग्धव्यवसायात मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांना ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळावी, यासाठी शासनातर्फे महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.”
— वैकुंठ पाटील, सभापती, कृषी, दुग्धविकास व पशुसंवर्धन









