अलिबाग (अमुलकुमार जैन): मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील पवन वासुदेव कोटकर (वय २५) या युवकाचा अलिबागजवळील वरसोली समुद्रकिनारी अचानक मृत्यू झाला. १४ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पवन हा ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील मैत्रीण दीपाली निखिल नाकती हिच्यासोबत लोटस कॉटेज येथे फिरण्यासाठी आला होता.
यावेळी पवनच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. त्याला खासगी रुग्णवाहिकेद्वारे अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नातेवाईकांनी सुरुवातीला कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितल्याने मृतदेह त्यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र, शवविच्छेदन आवश्यक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
पवनच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून, तरुणाच्या आकस्मिक निधनाने कोर्लई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









