पीएनपीच्या ओवी पाटीलची मुंबई विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये पीएनपी होली चाईल्ड स्कूल, वेश्वी-अलिबाग येथील विद्यार्थिनी ओवी प्रणय पाटील हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शानदार यशाच्या जोरावर तिची मुंबई विभागीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ओवीने आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ओवीने मिळवलेल्या या यशाबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी होली चाईल्ड स्कूलच्या एसएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे, क्रीडा प्रशिक्षक अक्षय डाकी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच आगामी मुंबई विभागीय स्पर्धेसाठी क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ओवीच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातील प्रगतीही अधोरेखित झाली असून, तिच्या पुढील स्पर्धेतील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.