अलिबागमध्ये रंगला खेळ पैठणीचा आशा सखींच्या कार्याचे कौतूक सायंकाळी महागरब्याचे आयोजन


अलिबाग  (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत ठेवण्याचे काम आशा सखी खंबीरपणे करतात. शासनाच्या सर्व योजना घराघरात पोहचविण्यासाठी धडपडत असतात. मात्र, वेगवेगळ्या जाहिरातीवर निधी उधळण्यास शासनाकडे पैसे आहेत. परंतु, जिवाची पर्वा न करता, आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या आशा सखींना तो मानपान देण्यास सरकार उदासीन असल्याची खंत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आशा सखींच्या कार्याचे कौतूक करीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्याच पद्धतीने आशा सखींना चांगले मानधन, प्रवास भत्ता व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी लढा देणार असून, त्यांच्या पाठीशी कायम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष अलिबाग तालुका महिला आघाडीच्यावतीने रविवारी (दि.25) स्नेहमेळावा आणि ‌‘आशा सखी, खेळ पैठणीचा‌’ या कार्यक्रमाचे आयोजन अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी चित्रलेखा पाटील संवाद साधताना बोलत होत्या.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, वृषाली ठोसर, तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, रोशनी मोकल, मा. नगरसेविका वृशाली ठोसर, डॉ. साक्षी पाटील, ॲड. अश्वीनी ठोसर, ॲड.निलम हजारे, संजना कीर, आक्षी सरपंच रश्मी पाटील आणि मुळे सरपंच रोहिणी पाटील आदींसह शेकापच्या विविध आघाडीच्या महिला पदाधिकारी, सदस्य, अलिबाग नगरपरिषदेच्या आजी-माजी नगरसेविका, आशा सेविका व महिला मोठ्या संख्येेने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या संकल्पनेतून शेकाप महिला आघाडीच्यावतीने आशा सेविकांसाठी स्नेह मेळावा आणि आशा सखी सारखा चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. कामांमध्ये व्यस्त असताना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यक्त होण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा सखींसाठी खेळ आणि मनोरंजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुका महिला आघाडीच्या प्रमुख नागेश्वरी हेमाडे आणि त्यांच्यी टीमने एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही आशा, प्रेम, बांधिलकी ठेवून सर्व महिला या कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आल्याचा आनंद आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे, अशा अनेक प्रकारची कामे आशा सेविकांनी केली आहेत. त्यांचे समाजातील योगदान खऱ्या अर्थाने मोलाचे राहिले आहे. जितक्या ताकदीने व आवडीने खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन आशा सेविका काम करतात, त्या अपेक्षेने त्यांना मानपान शासनाकडून दिला जात नाही, ही मोठी खंत आहे. शासनाने त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. गोरगरीबांसह अन्यायग्रस्तांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष कायमच आहे. शेकापचे सरचिटणिस जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच पद्धतीने आशा सेविकांना चांगले मानधन, प्रवास भत्ता व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी लढा देणार आहे. आशा सेविकांचा त्यांचा मान व हक्क मिळाला पाहिजे ही शेकापची भुमिका आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
‌‘आशा सखी, खेळ पैठणीचा‌’ या कार्यक्रमानंतर सायंकाळी महागरबा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या संगीतमय उत्सवात शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच तरुण तरुणांनी, ग्रामस्थ पारंपरिक पोशाखात एकत्र येऊन महागरब्याचा आनंद लुटला.
यावेळी जिल्हा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, वृषाली ठोसर, ॲड. अश्वीनी ठोसर, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, अलिबाग पंचायत समिती सदस्या अंजली ठाकूर, अलिबाग नगरपरिषदेचे पाणी सभापती अनिल चोपडा, डॉ. साक्षी पाटील, संजना कीर, ॲड. निवेदिता वाघमारे, जमाल सय्यद, ॲड. परेश देशमुख, चेंढरेचे माजी सरपंच दत्ता ढवळे, युवा नेतृत्व हर्ष ढवळे, अलिबाग तालुका पुरोगामी युवक प्रमुख विक्रांत वार्डे आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आणि तरुण-तरुणी उपस्थित होते.
शेकापच्यावतीने पीएनपी नाट्यगृहाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महागरब्यात अनेक मंडळी सहभाग घेतला. गाण्यांच्या सुरावर ठेका घेऊन प्रत्येकजण आपल्या शैलीमध्ये गरब्याचे सादरीकरण करीत होते. नवरात्री संपल्यानंतरही कोजागिरीच्या दुग्धशर्करा रात्रीत गरब्याचा आणि दांडियाचा रंग अधिकच गडद झाला होता. चंद्रप्रकाशाच्या साक्षीने हजारो तरुण-तरुणी पारंपरिक पोशाखात एकत्र येऊन या संगीतमय उत्सवाचा आनंद घेत होते. कोजागिरीची शांत, आल्हाददायक रात्र आणि गरब्याचा जल्लोष यांचा एक सुंदर संगम या निमित्ताने पाहायला मिळाला. पारंपरिक आणि आधुनिक संगीताच्या तालावर चालणाऱ्या पारंपरिक गरब्यासोबतच आधुनिक डीजे आणि लाइव्ह बँडच्या गाण्यांवर अनेकजण थिरकत होते. रात्री उशिरापर्यंत चालणारा महागरबा या महोत्सवांचे मुख्य आकर्षण ठरले. दरम्यान, नृत्यांचे सादरीकरण होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांचा गौरवही करण्यात आला. अलिबागमधील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर साठ्ये यांनी पॅरिस ते मुंबईच्या विमान प्रवासात एका वयोवृद्ध प्रवाशाला जीवनदान दिले. आठ तासांच्या प्रवासात त्यांनी आपले कर्तव्य बजावताना माणुसकीही जपण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याचे कौतूक म्हणून शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते डॉ. साठ्ये यांचा सन्मान करण्यात आला.

समाजासाठी आशा सेविकांचे योगदानः ॲड.मानसी म्हात्रे
आशा सेविकांसाठी शेकाप महिला आघाडीच्यावतीने एक चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेळ व मनोरंजनासह पैठणी क्वीन बनण्याची संधी मिळाली आहे. आशा सेविकांसाठी समाजाचे खुप मोठे देणे आहे. प्राथमिक स्वरुपातील आरोग्य सेवा उभी ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोरोना काळात आशा सेविकांनी समाजासाठी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. आशा सेविकांसह सर्व क्षेत्रातील महिलांनी या कालावधीत काम केले. समाजामध्ये सुरु असलेला दृष्ट प्रवृत्ती आणि विचारांचा अंधार घालविण्यासाठी निश्चितपणे आशा सेविकांचे योगदान खुप मोठे ठरणार आहे, असा विश्वास शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला

खेळ मनोरंजनातून लुटला आनंद
कोजागिरी पौर्णिमाच्या निमित्ताने शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडी टीम आणि चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत ‌‘आशा सखी, खेळ पैठणीचा‌’ कार्यक्रम अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात रविवारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आशा सेविकांसोबत संवाद साधण्याबरोबरच खेळ, मनोरंजन आणि क्वीन पैठणीची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आशा सेविकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. वेगवेगळ्या फेऱ्या घेण्यात आल्या. गाण्यांच्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात आली. यावेळी अनेक महिलांचा भेटवस्तू देऊन गौरवण्यात आला. सहभाग घेतलेल्या आणि वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. खेळासह मनोरंजनातून अनेक महिलांनी आनंद लुटला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप जगे आणि गुड्डया जाधव यांनी केले.