रायगड (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी (दि. २४) आयोजित शालेय जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील तिरंदाजांनी पदकाला गवसणी घालत अचूक वेध घेतला. रायगडच्या खेळाडूंनी १५ सुवर्ण , १३ रौप्य , ५ कांस्य पदकांची कमाई केली. चार तिरंदाजांनी आपल्या कौशल्याची छाप स्पर्धेवर पाडली. या स्पर्धेत बावलेकर आर्चरी अकॅडमीच्या अलिबाग येथील पाच तिरंदाजांनी स्पर्धेवर आपले वर्चस्व ठेवले. कंपाऊंड प्रकारात ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांचा अचूक निशाणा या तिरंदाजांनी साधला. हि स्पर्धा १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील मुले आणि मुलींमध्ये झाली. या स्पर्धेसाठी इंडियन , कंपाऊंड आणि रिकव्ह असे तीन प्रकारचे धनुष्य वापरण्यात आले होते.
या स्पर्धेत इंडियन प्रकारात १४ वर्षांखालील मुलींच्या गटात त्रिशा घोलप सुवर्ण, श्रिया टेंबे रौप्य , शुभ्र गुरव कांस्य आणि असामी जगताप हिने विशेष प्राविण्य मिळविले. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात अमित गडखल सुवर्ण, कार्तिक जोशी रौप्य , लक्षराज जंगम कांस्य आणि शंभूराजे देशमुख याने विशेष प्राविण्य मिळविले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अर्णव शेडगे सुवर्ण, सुमित आंधळे रौप्य, सुखप्रीत सिंह कांस्य आणि पांडुरंग हंबीर याने विशेष प्राविण्य मिळविले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात निधी चौधरी सुवर्ण , सोनल चव्हाण रौप्य , ममता वाघमारे कांस्य आणि रितिका महाडिक हिने विशेष प्राविण्य मिळविले. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात जुनेद अन्सारी सुवर्ण, मोहम्मद अहमद याने रौप्य पदक पटकावले. मुलींच्या गटात जयश्री वाघमारे हिने सुवर्ण पदक पटकावले.
रिकव्ह प्रकारात १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सार्थक महामुणकर याने सुवर्ण पदक पटकावले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात मकरंद मच्छिन्द्रनाथ सुवर्ण तर रुद्र निंबरे याने रौप्य पदक पटकावले, १७ वर्षाखालील मुलींच्या गटात श्वेता विश्वनाथ हिने सुवर्णपदक पटकावले. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात जय पाटील सुवर्ण तर पारस पवार याने रौप्य पदक पटकावले.
कंपाऊंड प्रकारात १४ वर्षाखालील मुलींच्या गटात पीएनपी होली चाइल्ड शाळेची विद्यार्थिनी ओवी पाटील हिने सुवर्णपदक पटकावले, तर चिमणराव केळकर विद्यालयाची विद्यार्थिनी स्वहा कदम हिने रौप्यपदक मिळवले. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात कल्पक उतेकर सुवर्ण आणि देवस्य वालिया याने रौप्य पदकावर निशाणा साधला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट मेरी हायस्कूलचा विद्यार्थी आशय आंग्रे याने सुवर्णपदकावर नाव कोरले. तर सार्थक बेटकर याने रौप्य पदक पटकावले. तसेच, १७ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट मेरी हायस्कूलची विद्यार्थिनी तनिषा वर्तक हिने सुवर्णपदक, तर सई पिळणकर हिने रौप्यपदक पटकावले. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात मयूर बांगारा सुवर्ण, आर्यन कोटकर रौप्य तर विराज माने याने कांस्य पदक पटकावले. मुलींच्या गटात इशा पवार हिने सुवर्ण पदकाचा वेध घेतला.
परीक्षक म्हणून जिल्हा क्रीडा संकुल अलिबागचे क्रीडा अधिकारी देविदास पाटील, बावलेकर आर्चरी अकॅडमीचे प्रशिक्षक संतोष जाधव, लाभेश तेली, आयुष्य खोत, यांनी काम पाहिले. या सर्व खेळाडूंची ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या विभागीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.









