आरसीएफ शाळेच्या व्यवस्थापनात बदल; नवीन शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी


अलिबाग  प्रतिनिधी: राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या (आरसीएफ) थळ येथील शाळेच्या व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून आरसीएफ शाळेचे व्यवस्थापन पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्याकडून काढून घेत, डिएव्हि काॅलेज मॅनेजिंग कमिटी, नवीदिल्ली यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
आरसीएफ शाळेच्या प्रशासनाकडून यासंदर्भातील अधिकृत सूचना १४ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संस्थेकडून शाळेच्या संचालनास नकार देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची पूर्तता व्हावी यासाठी आरसीएफ प्रशासनाने नवी जबाबदारी दिल्लीतून संचालित होणाऱ्या डीपीएस मॉनिटरिंग कमिटीवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून शाळा पुनर्रचित होणार असून, त्यासाठी आवश्यक हस्तांतर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा प्रशासनाने पालक व विद्यार्थ्यांना नवीन व्यवस्थापन बदलामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या बदलामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यपद्धतीत नवचैतन्य येण्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक पातळीवर याची उत्सुकता वाढली आहे.