उद्धव-राज एकत्र येणार ?


मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर एकमत असलेले, पण एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, अशी उत्सुकता राज्यातील तमाम शिव आणि मनसैनिकांना लागून राहिली आहे. अनेकदा टाळी देण्याचे प्रयत्न झाले, पण हे बंधू एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. पण सध्या स्वतःच्याच अस्तित्वासाठी लढणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरे यांनी आता मात्र एकमेकांना पुन्हा एकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता असून ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता दुणावली आहे.