अलिबाग प्रतिनिधी): स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या उद्देशाने नागाव ग्रामपंचायतीने शून्य कचरा व्यवस्थापन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थांना मोफत कचराकुंडी वाटपाचा शुभारंभ तसेच महिला आर्थिक साक्षरता व विमा योजना अर्ज भरण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले.
बुधवारी, १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी ग्रामपंचायत शून्य कचरा संकल्पनेवर ठाम असून, कचरा योग्य पद्धतीने वर्गीकृत करून विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षणही लवकरच देण्यात येईल, असे सांगितले.
कार्यक्रमात माजी सरपंच नंदकुमार मयेकर, ‘आम्ही’ संस्थेच्या प्रमुख रोसलिन परेरा, रोहित वतसाह, समीर मोरे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी श्वेता कदम आणि सदस्य प्रियांका काठे, अंकिता शेवडे, लीना म्हात्रे, निकिता पाडेकर, मंगळा नागे, वीणा पिंपळे, सुरज म्हात्रे उपस्थित होते.
महिला आर्थिक साक्षरता आणि विमा योजना शिबिरात अनेक महिलांनी सहभाग नोंदवत विमा कवचासाठी अर्ज सादर केले. ग्रामपंचायतीने अशा उपक्रमातून गावकऱ्यांमध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती घडवून आणली आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायतीचे विविध स्तरांवरील प्रतिनिधी व ‘आम्ही’ संस्थेचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.









