अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करणारे देवा ग्रुप फाऊंडेशनचे कोकण प्रदेश सचिव ऍड. विश्वनाथ भगत यांच्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन या राज्यस्तरीय संस्थेने ऍड. विश्वनाथ भगत यांना कामाची पोचपावती दिली आहे. या संस्थेमार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार ऍड. विश्वनाथ भगत यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथील समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिने अभिनेत्री फाल्गुनी झेंडे, सिने अभिनेत्री रंजना सिंग, डॉ. अविनाश सकुंडे, अनुर्वी फाऊंडेशनचे रवी अग्रवाल, आनंदी फाऊंडेशनचे गणेश विटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
देवा ग्रुप फाऊंडेशनचे कोकण प्रदेश सचिव ऍड. विश्वनाथ भगत हे पेशाने वकिलीमध्ये कार्यरत असलेतरी सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात ते काम करीत आहेत. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रमांबरोबरच आरोग्य विषयक समस्यांचे तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने निराकरण करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. आजवर त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन विविध आजारांबाबत समुपदेशन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल आनंदी फाऊंडेशन या संस्थेने घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.









