अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने प्रचंड जोर धरला असून, विशेषतः किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये संततधार आणि वादळी वाऱ्यांनी हैराण केले आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, सखल भागांत पाणी साचले आहे.
हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील ४८ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा व उरण तालुक्यांत जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून, वीजपुरवठा खंडित होणे, झाडे कोसळणे, वाहतूक खोळंबणे अशा घटना घडल्या आहेत.
बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९१ मिमी पावसाची नोंद झाली, तर काही ठिकाणी पुढीलप्रमाणे अतिवृष्टी झाली:
रोहा : १५९ मिमी
तळा : १५० मिमी
मुरुड : १२४ मिमी
पेण : १२० मिमी
श्रीवर्धन : ११६ मिमी
माणगाव : ११५ मिमी
म्हसळा : १०९ मिमी
अलिबाग : ९६ मिमी
या मुसळधार पावसामुळे आंबा, सावित्री, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून, रोहा शहर आणि आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भिरा धरणातून विसर्ग सुरू असल्याने कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे. बुधवार दुपारपर्यंतही संततधार कायम होती, त्यामुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक यंत्रणा पूर्ण सज्ज असून, नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









