अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथे एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात तब्बल 1000 आदिवासी जोडपी विवाहबंधनात अडकली. मूलनिवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्था यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या भव्य कार्यक्रमाला आदिम उन्नत सेवा संघ तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून हरिद्वार येथील डॉ. भगवती नंदा आखाड्याच्या महामंडलेश्वर उपस्थित होत्या. त्यांनी या सामूहिक विवाह सोहळ्याचे विशेष कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे आदिवासी समाजात सामाजिक एकात्मता, आर्थिक बचत आणि सशक्तीकरणाचा संदेश पोहोचतो,” असे त्या यावेळी म्हणाल्या.
सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमात विवाहसोहळ्यावर होणारा मोठा खर्च टाळून, पारंपरिक आणि सांस्कृतिक रितीरिवाज जपत अत्यंत साधेपणाने व सुसंगत पद्धतीने विवाह पार पाडले गेले. यात कातकरी समाजातील नवविवाहित तरुण-तरुणींना शासकीय योजनांची माहिती, तसेच त्याचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले.
आदिवासी विकास विभागाने अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे, तसेच शासकीय योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशी मागणीही यावेळी अनेक मान्यवरांनी केली. समाजाच्या विविध स्तरांतून या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी भावना व्यक्त केली.
हा विवाह सोहळा केवळ एका सामाजिक कार्यापुरता मर्यादित न राहता, तो एक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेरणास्रोत ठरला आहे.