अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागचे सुपुत्र, यशस्वी उद्योजक आणि निष्ठावान समाजसेवक गजेंद्र ऊर्फ गजुभाऊ दळी यांचे आज, रविवारी (२७ जुलै) वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
गजुभाऊ दळी हे ब्रह्मा विष्णू महेश सिनेप्लेक्सचे संस्थापक म्हणून ओळखले जात. त्यांच्या दूरदृष्टीने अलिबागमध्ये आधुनिक चित्रपटगृह उभारले गेले, जे आजही अनेक अलिबागकरांचे आवडते ठिकाण आहे.
गजुभाऊंचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील घाटरोळ गावचे. त्यांच्या वडिलांनी मुंबईत पानाचे दुकान चालवले आणि नंतर अलिबागमध्ये स्थायिक होत विडी व पान व्यवसाय सुरू केला. गजुभाऊंचा जन्म १९ मे १९३४ रोजी अलिबागमध्ये झाला. शिक्षणानंतर त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात पाऊल टाकले. १९७० साली त्यांनी महेश चित्रमंदिराची स्थापना केली, जे पुढे आधुनिक सिनेप्लेक्समध्ये रूपांतरित झाले.
उद्योजकतेबरोबरच समाजसेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी ४२ देशांचा प्रवास केला होता. ते ज्येष्ठ नागरिक संघटनेत कार्यरत होते आणि लायन्स क्लबचे सदस्य होते. लायन्स हेल्थ फाउंडेशनसाठी १० लाखांची आधुनिक वैद्यकीय उपकरणांची मदत केली. तसेच, १०४ आदिवासी जोडप्यांचे सामुदायिक विवाह लावून त्यांनी समाजसेवेला स्पर्श दिला.
गजुभाऊ हे निर्व्यसनी आणि उत्तम जीवनशैलीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, दोन पुत्र – सत्यजीत आणि विश्वजीत, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गजुभाऊंच्या निधनाने अलिबागने एक दूरदृष्टीचा उद्योजक, संवेदनशील समाजसेवक आणि आदर्श नागरिक गमावला आहे.