अलिबाग (प्रतिनिधी) : माननीय महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून १ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील कार्यालय अलिबाग येथे महसूल दिन साजरा करण्यात आला. उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्री. मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही प्रतिसाद लाभला.
या दिनानिमित्त सन २०२४-२५ या कालावधीत महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. श्री. चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत सर्व कर्मचाऱ्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ८६ अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये त्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध तपासण्या करण्यात आल्या.
तसेच, सामाजिक बांधिलकी जपत महसूल विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विभागातील २५ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले.
या उपक्रमांमुळे महसूल दिन केवळ औपचारिक न राहता, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सामाजिक जाणीवेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरला.