सततच्या टोमण्यांचा राग आल्याने नातवाने केली आजोबांची हत्या; तीन तासांत पोलिसांनी केला उलगडा


रायगड (प्रतिनिधी): आजोबांची टोमणे देण्याच्या सवयीचा जीवघेणा शेवट – नातवाकडून लोखंडी रॉड व सुरीने हत्या

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खांडा मोहल्ला येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत टोमणे मारल्याच्या कारणावरून १८ वर्षीय नातवाने आपल्या ७२ वर्षीय आजोबांची निर्घृण हत्या केली. हत्या करून अनोळखी व्यक्तीकडून खून झाल्याचा बनाव रचण्यात आला होता, मात्र अवघ्या तीन तासांत म्हसळा पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणत आरोपीला अटक केली.

मृत व्यक्तीचे नाव शौकत अली हुसेनमियाँ परदेशी (वय ७२) असून, आरोपी त्यांचा नातू मोहम्मद असगर अली परदेशी (वय १८) आहे. तो सध्या माणगाव येथील द.ग. तटकरे विद्यालयात शिक्षण घेत होता. आजोबांकडून ‘तू काही करू शकत नाहीस’, ‘कधीच सुधारणार नाहीस’ असे टोमणे ऐकावे लागत असल्यामुळे तो मानसिक तणावात होता. तसेच, आजोबा आईकडे वाईट नजरेने पाहतात, असा आरोपही त्याने केला.

घटनेच्या दिवशी सायंकाळी, घरातील सदस्य वरच्या मजल्यावर असताना आरोपीने खालच्या खोलीत झोपलेल्या आजोबांवर लोखंडी रॉडने डोक्यात वार केला. त्यानंतर सुरीने गळा आणि मनगटावर वार करत हत्या केली. नंतर एक अनोळखी व्यक्ती घरात घुसून हत्या केल्याचा देखावा तयार करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सविता गर्जे आणि पोलिस निरीक्षक संदीप कहाळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरु केला असता, आरोपीच्या जबाबात विसंगती आढळली. त्याच्या अंगावरच्या खाजवलेल्या जखमांमुळे पोलिसांचा संशय वाढला. पोलिसी कौशल्याने विचारणा करताच आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

ही केस अवघ्या तीन तासांत उघडकीस आणल्यामुळे म्हसळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या तपासात पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, पोलीस उपनिरीक्षक एडवले व त्यांच्या पथकाने मोलाचे योगदान दिले.