अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील विविध भागांत शेतकऱ्यांना युरिया खत टंचाईचा सामना करावा लागत असून त्यामुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी कृषी अधिक्षक रायगड, अलिबाग यांच्याकडे युरिया खत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाठवलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, मागील काही आठवड्यांपासून युरिया खत उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीकपेरणीचे नियोजन विस्कळीत झाले असून त्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांना वेळेत खत न मिळाल्यास नाहक नुकसान होईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
राजा केणी यांनी आपल्या निवेदनात तलाठी सजा ताडवणळे, श्रीगाव, कुडुंबळे, पिटकीरी, रावेत, कुडूस, आंबेगाव, पेशारी, चरी, कोपर, कमळे, शाहापुर, शहाबाज इत्यादी गावांमधील शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.