अलिबाग (प्रतिनिधी): हा भ्याड हल्ला शेतकरी कामगार पक्षाच्या स्वाभीमानावर झालेला हल्ला आहे. समोरून हल्ला करण्याची त्यांची हिम्मत नाही, म्हणून मागून हल्ला करण्याचा डाव केला. संपूर्ण राज्यात शेतकरी कामगार पक्षाची महिला आघाडी आक्रमक म्हणून ओळखली जाते, त्या पद्धतीने निषेध व्यक्त केला पाहिजे. चवळ्या पावळ्यांना महत्व न देता सुरु असलेल्या दंडेलशाही विरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शेकाप महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी करत शेकापच्या नेत्या, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यावर शिंदे गटातील आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी मागून भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अलिबागमध्ये बुधवारी (दि.20) सभा आणि मोर्चा काढण्यात आला. यावेळी मानसी म्हात्रे बोलत होत्या.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, अलिबाग तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, शेकाप शहर महिला आघाडी प्रमुख ॲड. निलम हजारे, सोनाली कासार, सतिश प्रधान, अशोक प्रधान, अनिल चोपडा, संजना किर, अनिल गोमा पाटील, विक्रांत वार्डे, आदींसह वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे म्हणाल्या की, सध्या अलिबाग, मुरूड रोहा मतदार संघाची काय परिस्थिती आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलांची अवस्था बिकट झाली आहे. विद्यार्थी, महिला, कामगारांना चिखल, खड्यातून प्रवास करावा लागत आहे. खड्यांमुळे एसटी फेऱ्या बंद आहेत. प्रवासी त्रस्त झाले आहेत. स्मार्ट मीटरच्या नावाखाली तिप्पट वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मतदार संघात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि दादागिरी रेटून करायची ही विरोधकांची भुमिका आहे. आता हे खपवून घेणार नाही. सोशल मिडीयाचा आधार घेत वेगवेगळे व्हिडीओ टाकले जात आहेत. हे चाळे बंद झाले पाहिजे, त्या पध्दतीने आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गल्लीसह वाड्या वस्त्यांसह शहरी भागात दंडेलशाही विरोधात तुकडी तयार केली पाहिजे. विरोधक काही चुकीचे करीत असेल तर रोखणे, सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे.
शेतकरी कामगार पक्षाची 78 वर्षाची परंपरा आहे. तीन पिढीचा वारसा आहे. संघर्षातून पक्ष निर्माण झालेला आहे. त्यामुळे चवळ्या पवळ्यांना महत्व न देता आपल्या पक्षाची ताकद त्यांना दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. चित्रलेखा पाटील यांनी हजारो मुलींना सायकली वाटप केल्या आहेत. कोरोना काळात रुग्णांबरोबरच गरीब गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्यांचे कार्य समाजाच्या हितासाठी आहे. मिठेखार येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला जागे करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचे कार्य मोलाचे आहे, असे मानसी म्हात्रे यांनी सांगितले.
शेतकरी भवन समोर निषेध मोर्चा
शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यावर मागून मंगळवारी भ्याड हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सर्वत्र जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. चित्रलेखा पाटील यांच्यावर मागून झालेल्या हल्ल्याच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निषेध सभा अलिबागमध्ये घेण्यात आली. यावेळी महिलांसह अनेकांनी हल्ल्याचा निषेध आपल्या शैलीत व्यक्त केला. त्यानंतर शेतकरी भवन समोर सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन मानसी दळवीसह अन्य जणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. या निषेध मोर्चात शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण, तरुणी व ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान हातात काळे झेंडे दाखवून अनेकांनी निषेध व्यक्त केला.
षडयंत्र करणाऱ्यांना रोखण्याची गरज – सुरेश घरत
साम, भेद ,दंडाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. आपल्यावर हात उगारणाऱ्यांचे हात मोडण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. दहशत करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. करोडो रुपयांचा निधी आणल्याच्या जाहीरातबाजी मोठ्या प्रमाणात केल्या. परंतु तो पैसा गेला कुठे असा सवाल दळवी यांना विचारला जात आहे. ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन त्यांना कामे मिळत नाही, त्यामुळे ठेकेदार शिव्या देत आहेत. समाजकार्य फक्त शेकापचे आहे. या तालुक्यात अनेक विकास कामे ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झाली आहेत. शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांचे कार्य समाज कार्य मोठे आहे. त्यांना रोखण्यासाठी विरोधकांचे षडयंत्र चालू आहे. वेगळ्या पध्दतीचे आंदोलन करण्याची गरज आहे. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.