मानसी दळवी – चित्रलेखा पाटील वाद प्रकरण तीव्र; दोन्ही पक्ष रस्त्यावर


अलिबाग (प्रतिनिधी) : मंगळवारी झालेल्या हातघाईच्या प्रकरणानंतर शिवसेना नेत्या, आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांच्यातील वाद आणखी चिघळताना दिसत आहे. या प्रकरणावरून बुधवारी दोन्ही पक्षांनी आंदोलने करून परस्परविरोधी भूमिका मांडत निषेध नोंदवला.

सकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अलिबाग येथील शेतकरी भवनसमोर निदर्शने केली. मानसी दळवी यांनी केलेल्या वर्तनाचा तीव्र निषेध नोंदवत जबाबदारीची मागणी करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुपारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन छेडले. शेकाप नेत्यांकडून मानसी दळवी यांच्याविरोधात होत असलेला प्रचार थांबवावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

हा वाद मुरूड तालुक्यातील मिठेखार येथे घडलेल्या दुर्घटनेदरम्यान सुरू झाला. येथील दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनाग्रस्त स्थळी मानसी दळवी व चित्रलेखा पाटील एकत्र आल्या. परिस्थितीवर चर्चा सुरू असतानाच चित्रलेखा पाटील यांनी “५० खोके” असा उल्लेख केला. या वक्तव्यावर मानसी दळवी यांनी तीव्र आक्षेप घेत जाब विचारला. वाद वाढत जाऊन हातघाईची वेळ आली.

घटनेनंतर प्रकरण शांत होईल अशी अपेक्षा होती, मात्र उलट दोन्ही पक्षांनी आंदोलने करून संघर्ष अधिकच तीव्र केला. स्थानिक पातळीवर या वादाची मोठी चर्चा सुरू असून, राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
********
जे घडले ते फार खालच्या पातळीवरील राजकारण होते. कुणाचे नाव न घेता ५० खोके म्हटले तर कुणाला झोंबण्याचे कारण नव्हते. राजकारणात विरोध असला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. टीकादेखील सहन केली पाहिजे, पण हे घाणेरडे राजकारण मी अनुभवले. अशा पदाधिकाऱ्यांमुळे अलिबागची, रायगडची प्रतिमा मलीन होते, ही बाब मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहे.
चित्रलेखा पाटील, शेकाप प्रवक्त्या

********

प्रसंग कुठलाही असो, चित्रलेखा पाटील नेहमीच ५० खोके म्हणत आम्हाला हिणवत असतात. परंतु असे आरोप होऊनदेखील जनतेने महेंद्र दळवी यांच्यासारखा योग्य लोकप्रतिनिधी निवडला. शेवटी आम्हालाही मन आहे. भावना आहेत, आत्मसन्मान आहे. त्यामुळे मी माझ्या भाषेत उत्तर दिले.
मानसी दळवी, शिवसेना नेत्या.