“रायगड जिल्ह्यातील बेरोजगारी संपवायची…राजाभाई केणी


अलिबाग (प्रतिनिधी):रायगड जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येला उपाय म्हणून जे.एस.डब्ल्यू कंपनीचा प्रस्तावित तिसरा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक सुशिक्षित युवकांना रोजगार मिळावा, त्यांना आपापल्या शिक्षणानुसार कामाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या फौजफाट्यासह हजेरी लावून या प्रकल्पाला जाहीर पाठींबा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, “रायगड जिल्ह्यातील बेरोजगारी संपवायची असेल तर अशा औद्योगिक प्रकल्पांची गरज आहे. डिप्लोमा, डिग्री व आयटीआय धारक पदविधर युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे ही काळाची गरज आहे. हा प्रकल्प उभारल्याने स्थानिकांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांचा आर्थिक स्तरही उंचावेल.”

या प्रकल्पामुळे केवळ रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत, तर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळणार आहे. लघुउद्योग, सेवा क्षेत्र, परिवहन आणि इतर पूरक व्यवसायांना देखील यातून प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे स्थानिक तरुणाईला केवळ नोकऱ्याच नव्हे, तर उद्योजकतेची नवी दारेही उघडण्याची संधी मिळेल.

राजाभाई केणी यांनी पुढे सांगितले की, “आम्ही नेहमीच स्थानिक युवकांच्या हितासाठी लढा दिला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास रायगड जिल्ह्याच्या भविष्याला नवे दिशा व बळ मिळेल. त्यामुळे शिवसेना या प्रकल्पाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”

या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत जिल्ह्यातील बेरोजगारांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पामुळे रायगडच्या युवकांना स्थिरता आणि रोजगार या दोन्ही बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे.