राज्यातील भजनी मंडळांना गणपतीबाप्पाची मोठी भेट


भांडवली अनुदान देण्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (धनश्री रेवडेकर): राज्य सरकारने गणेशोत्सवाला नुकताच ‘राज्य महोत्सव’ हा मान दिल्यानंतर, आता राज्यातील भजनी मंडळांसाठी भांडवली अनुदान जाहीर करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

या निर्णयानुसार, राज्यभरातील १,८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान भजन साहित्य खरेदीसाठी दिले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरातील अनेक भजनी मंडळांना आर्थिक बळ मिळणार असून, पारंपरिक भजन संस्कृतीला चालना मिळणार आहे.

अनुदान मिळविण्यासाठी मंडळांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. हे अर्ज २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या शासकीय वेबपोर्टलवर उपलब्ध राहतील.

“भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. गणेशोत्सवासोबतच आपल्या भजन परंपरेलाही हे अनुदान अधिक बळकटी देईल,” असे आवाहन शेलार यांनी केले.