रायगड (प्रतिनिधी): सुधागड तालुक्यातील पाली पोलीस ठाणे हद्दीतील गोंदाव गावात अवघ्या एका गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी रविवारी (दि. २१ सप्टेंबर) रोजी मोठी कारवाई केली. टायगर गोटफार्म नावाच्या फार्महाऊसवर मेंढ्यांच्या झुंजींवर पैसे लावून जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा यांच्या लेखी परवानगीने छापा टाकला.
पाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी हेमलता शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रायगड अंमलदारांच्या संयुक्त पथकाने गोटफार्मवर धाड घालून तब्बल १ कोटी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात जुगार साहित्यासह रोख रक्कम, मेंढे आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी वापरलेली वाहने यांचा समावेश आहे. या कारवाईत ७५ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन मुख्य आरोपी – इम्रान कुरेशी (रा. कलिना, मुंबई) आणि अतिक शेख (रा. पुणे) – हे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपास अधिकारी एस.एम. निकम यांनी सांगितले की, या प्रकरणातील अटक आरोपींची चौकशी सुरू आहे. मेंढ्यांना जबरदस्तीने झुंजीस प्रवृत्त करून त्यावर पैज लावणे हा गंभीर गुन्हा असून यामध्ये प्राण्यांवर क्रूरता केली जाते. पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात अशाप्रकारे प्राण्यांच्या झुंजींवर पैज लावली जात असल्याचे आढळल्यास किंवा माहिती मिळाल्यास तातडीने पोलीसांशी संपर्क साधावा. मात्र, या धाडसी कारवाईमुळे रायगडमध्ये सुरू असलेला कोट्यवधींचा बेकायदेशीर जुगार उद्योग उघडकीस आला असून स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.









