रायगड (दिनकर भुजबळ): रायगड जिल्ह्यातील महाडची कन्या रोशनी रविंद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली असून, हा रायगडच्या क्रीडा इतिहासातील अभिमानाचा क्षण ठरला आहे.
एसबीसी क्रिकेट अकॅडमी व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची अष्टपैलू खेळाडू असलेली अवघ्या सोळा वर्षांची रोशनी ही रायगडमधून या स्तरावर निवड होणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे. याआधी तिची महाराष्ट्राच्या १५, १७ व १९ वर्षाखालील संघात निवड झाली होती.
गतवर्षी झालेल्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत रोशनीने लागोपाठ तीन शतके ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती जलदगती गोलंदाज तसेच सलामीवीर फलंदाज म्हणून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
रोशनीच्या मेहनतीबद्दल बोलताना तिचे वडील रविंद्र पारधी, प्रशिक्षक आवेश चिचकर व एसबीसी अकॅडमीचे अध्यक्ष बशीर चिचकर यांनी आनंद व्यक्त केला. “शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्य यामुळेच रोशनी आज या टप्प्यावर पोहोचली आहे,” असे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी तिचे अभिनंदन करताना सांगितले, “मुलांबरोबर मुलींमध्येही तितकीच गुणवत्ता आहे. योग्य संधी व प्रशिक्षण देण्यासाठी आरडीसीए वचनबद्ध आहे. भविष्यात रोशनी देशासाठी खेळेल, अशी अपेक्षा आहे.”
रोशनीच्या या कामगिरीबद्दल उपाध्यक्ष यशवंत साबळे, संचालक कौस्तुभ जोशी, समीर मसूरकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य व क्रिकेटप्रेमींनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रायगडची ही ‘सुकन्या’ आता महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघातून चमकणार आहे आणि भविष्यात भारतासाठी खेळेल, अशी सर्वांची मनापासून अपेक्षा आहे.





